वारकरी संप्रदायत संतांनी जात, धर्म, लिंग, वंश या पलिकडे जाऊन माणूस म्हणून सर्वांना एक झाले पाहिजे, अशी शिकवण दिली. त्यातूनच सर्व जाती- धर्मांच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी परंपरा समृध्द केली. वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले, वेगवेगळी संस्कृती असलेले, वेगवेगळ्या सामाजिक स्थरातून आलेले, वेगवेगळी आर्थिक परिस्थिती असलेले संत एकत्र आले. या संतानी पाहिलेल्या समताधिष्टित समाजाचे देखणे रूप आपल्याला पंढरपूरला जाणा-या विविध संतांच्या आषाढीच्या पालखी सोहळ्यात पहायला मिळते. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी संतांच्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दिंड्यामध्ये सुमारे चार - पाच लाख लोक सहभागी झालेले असतात. या सहभागी झालेल्यांमध्ये कुणी कुणाला जात विचारीत नाही, कुणी कुणाला धर्म विचारित नाही, कुणी कुणाला कोणत्या भागातून आला आहेस हे विचारित नाही, कुणी कुणाला गरीब आहेस की श्रीमंत आहेस म्हणून विचारित, कुणी कुणाला त्याचे पद विचारित नाही. कुणी कुणाला स्री किंवा पुरुष आहे म्हणून वेगळी वागणूक देत नाही. मंत्रालयात मंत्रीपदावर बसलेले मंत्री आणि त्यांच्याच कार्यालयात असणारा सफाई कामगार किंवा शिपाई एकाच दिंडीत चालतात. एकाच पंगतीला बसतात. 22 ते 30 दिवसांच्या प्रवासात. (काही संतांच्या दिंड्या 22 दिवसांत पोहचतात तर काही दूरवरून येणा-या संतांच्या दिंड्याना 30 दिवसांपर्यंतचा कालावधी लागतो.) कोणत्याही यंत्रणेत पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत नाही. अलिकडे 31 डिसेंबरच्या मध्यरात्री महानगरामध्ये नववर्ष साजरे केले जाते. मुंबई सारख्या मोठ्या शहरात लोक समुद्र किनारी एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करतात. त्यावेळी अनेकजणांनी मद्यपान केलेले असते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पाच पन्नास हजार लोक दोन-तीन तास एकत्र येतात तर तेथे बंदोबस्तासाठी शेकडो पोलिसांना तैनात करावे लागते. गेट वे ऑफ इंडिया, जुहू, शिवाजी पार्क, गिरगाव हे समुद्र किनारे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात त्या प्रत्येक पोलीस ठाण्यात तसेच भारतात काही भागात 31डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत किती तरी लाखो गुन्हे दाखल होतात. तक्रारी येतात. त्यात चोरी आणि विनयभंगाच्या तक्रारीचे प्रमाण मोठे असते. म्हणजे केवळ पाच पन्नास लोक दोन-तीन तास एकत्र आले तर शे-दिडशे गुन्हे वेगवेगळ्या भागात दाखल होतात. मात्र चार ते पाच लाख लोक सलग 22 दिवस एकत्र प्रवास करतात, एकत्र मुक्काम करतात. या काळात अनेक महिला उघड्यावर आंघोळ करतात. पण या काळात एकही गुन्हा दाखल होत नाही. एकही माता-भगिनी माझ्याकडे कुणी वाईट नजरेने पाहिले, चूकीचा स्पर्श केला अशी तक्रार करीत नाही. दिंड्याना जो क्रम लाऊन दिलेला आहे, तो क्रम कुणी बदलत नाही. हे कशाच्या बळावर हे सगळं इतकं सहज आणि सुरळीत चालत. ते बळ आहे बंधुत्वाचं. प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि बंधुत्वाची भावनाच 22 दिवस एकमेकांच्या माणुसपणाला सन्मान देत वाटचाल करते. माणूसपणाला उन्नत करण्याची भावना ही बंधुत्वातून निर्माण होते.
तर बंधुत्वाची भावना मजबूत झाली तर पोलिसांच्या हस्तक्षेपाची गरज उरणार नाही, याचे उदाहरण आपल्याला आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात पहायला मिळते.
पालखी सोहळ्यात संत वचनांचा सतत जागर होतो. त्यातूनच बंधुत्व प्रत्येकाच्या कृतीतून पाझरते. बंधुत्व-बंधुत्व म्हणजे तरी काय? तर प्रत्येकाच्या मनात परस्पर प्रेम, जिव्हाळा निर्माण होणे. संत परंपरेने प्रेमाचाच जागर केला आहे.केवढा मोठा हा संदेश आहे. मत्सरविरहीत समाजातच खरे बंधुत्व नांदू शकते. आषाढी वारीमध्ये कोणीही कुणाचा जात, धर्म, वंश, लिंग यावरून मत्सर करीत नाही. म्हणूनच बंधुत्वाचा अविष्कार तिथे पहायला मिळतो. सध्या वारीत दिसणारे बंधुत्व समाजात रुजेल तेव्हा समता आणि स्वातंत्र्य आपोआपच हातात हात घालून चालेल. बंधुत्वाचा विचार समाजात रुजावा यासाठी संत विचारांचा जागर झाला पाहिजे. ज्या दिवशी बंधुत्वाचा विचार समाजात रुजेल तेव्हाच आनंदी गाव सापडला असे म्हणता येईल.
खुप सुंदर लेख..... 👌👌👌👌
ReplyDeleteव्वा सतीश खूप छान लिहिलंय अप्रतिम लेख आहे ...
ReplyDeleteजेव्हा बंधुत्वाची भावना मनात रुजेल तेव्हाच आनंदाचा गाव सापडेल अप्रतिम संदेश दिला.. 👌👌👌
खूपच सुंदर लेख लिहिला आहे👌👌👏👏💐
ReplyDelete